मुंबई (प्रतिनिधी) : भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. किशोर वाघ हे मुंबईतील परेल येथील गांधी स्मारक रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल या पदावर कार्यरत होते. ५ जुलै २०१६ रोजी एका प्रकरणात ४ लाख रुपयांची लाच घेताना अटक झाल्यानंतर किशोर वाघ यांना निलंबित केले होते. या प्रकरणी किशोर वाघ यांच्या संपत्तीची एसीबीकडून खुली चौकशीही लावण्यात आली होती. यामध्ये कायदेशीर उत्पन्न, गुंतवणूक, ठेवी, खात्यावरील रकमेची आवक जावक, वारसा हक्काची मालमत्ता, खर्च इत्यादी बाबींचा सविस्तर तपास करण्यात आला.

या तपासात किशोर वाघ यांच्याकडे १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची अपसंपदा आढळून आली. ही अपसंपदा त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या सुमारे ९० टक्के इतकी आहे. त्यानुसार प्रथमदर्शनी दोषी आढळल्यामुळे लाचलुचपत विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ जगताप यांच्या तक्रारीवरुन किशोर वाघ यांच्या विरोधात १२ फेब्रुवारीरोजी मुंबई येथे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या बेहिशेबी संपत्ती प्रकरणाची चौकशी भाजपची राज्यात सत्ता असतानाच सुरु झाली होती. याच प्रकरणामुळे चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा तेव्हा रंगली होती.