कोल्हापूर (प्रतिनिधी) : एकतर्फी प्रेमातून एका युवकाने २०१८ पासून वारंवार पिडीतेशी जवळीक करण्याचा प्रयत्न केल्याने पिडीतीने १४ फेब्रुवारी २०१९ रोजी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी आज (शुक्रवार) बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार या युवकाला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्ष सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सकलेन समीर मुजावर (वय १९, रा. सी वार्ड बागवान गल्ली, रविवारपेठ, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.

सकलेन मुजावर याने जानेवारी २०१८ पासून एकतर्फी प्रेमातून १६ वर्षाच्या पिडीतीला वारंवार जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. यावेळी पिडीतेच्या नातेवाईकांनी त्याला समज देवूनही सकलेन हा पिडीतेच्या गल्लीमध्ये येऊन वारंवार जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्या त्रासला कंटाळून पिडीत मुलीने १४ फेब्रुवारी २०१९ रोजी गळफास आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर नातेवाईकांनी तिला दवाखान्यात दाखल करून तिच्यावर उपचार केल्याने तिचा जीव वाचला.  मुजावर विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झाले.

या खटल्यात एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. तर पिडीत मुलगी आणि इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. साक्षीदारांचे जबाब आणि सरकारी वकीलांचा युक्तिवाद उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांचे निवाडे ग्राह्य मानून सकलेनला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्ष सक्तमजुरी आणि १० हजार रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली. हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. महात्मे यांच्या कोर्टात चालला असून सरकारी वकील म्हणून अॅड. अमिता कुलकर्णी यांनी काम पाहिले.

यासाठी अॅड. भारत शिंदे,  अॅड. महेंद्र चव्हाण, अॅड. मिना पाटोळे, तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस. के. पवार, पोलीस अंमलदार कुंभार, पोलीस नाईक माधवी घोडके यांनी सहकार्य केले.