कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील सदर बाजार येथील दीड वर्षाच्या मुलाला शुक्रवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात लस दिली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या बालकाचा मृत्यू झाला. लसीकरणात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत आज सोमवारी नातेवाइकांनी आरोग्य केंद्राची तोडफोड केली.

यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील साहित्य, खिडक्यांच्या काचा, खुर्ची, टेबल आणि इतर साहित्याची जमावाकडून मोडतोड झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे रुग्णालयात कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा थरकाप उडाला. घटनेनंतर तत्काळ शाहूपुरी पोलीस सदर बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.