यड्राव (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे डेंग्यू आणि चिकनगुनियाची साथ पसरली आहे. येथील ग्रामपंचायतीने कचरा उठाव नियोजनाचा अभाव, परिसरातील अस्वच्छतेमुळे नागरीवस्तीमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे गावातील रुग्णसंख्या वाढू लागली आहे.

यड्रावमधील प्रत्येक घरामध्ये एकतरी रुग्ण हा चिकनगुनिया किंवा डेंग्यूचा आढळून येत आहे. यातच गावामध्ये असणाऱ्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये पुरेसा स्टाफ उपलब्ध नाही. कोरोनाचे लसीकरण सुरू असल्याने आशा स्वयंसेविका आणि आरोग्याधिकारी लसीकरणामध्ये व्यस्त आहेत. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींचे देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी करावी, तसेच ठोस उपाययोजना करून डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येवर आळा घालावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.