नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून भाजप ताणतणावात आहे. त्यामुळे भाजपचा ताणतणाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असे वक्तव्य केले असेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (शुक्रवार) येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी एका कार्यक्रमात आजी, माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी, असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले. यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत. यावर पटोले यांनी भाष्य केले आहे.

पटोले पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आहेत. पाच वर्ष हे सरकार चालणार आहे, असे कमिटमेंट आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला दिले आहे. त्यामुळे आमचे सरकार देखील स्थिर आहे. पण, उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. माजी मंत्री म्हणू नका, या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरही पटोले यांनी टीका केली. चंद्रकांत पाटलांना दिवस स्वप्न पडले असावे. त्यामुळे त्यांनी असे वक्तव्य केले असेल, असे पटोले म्हणाले.