पुणे (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांची चौकशी करण्यात यावी. तसे न झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पुण्यातील अलका चौकात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निषेधार्थ भाजपने आज (रविवार)  आंदोलन केले. त्यानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते. 

पाटील म्हणाले की, गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा देणार नसतील तर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांचा राजीनामा घेण्यास भाग पाडले पाहिजे. सभागृहात देखील सचिन वाझेला वाचविण्याचे काम अनिल देशमुख यांनी केले आहे. या संपूर्ण प्रकरणी देशमुख देखील दोषीच आहेत. त्यामुळे त्याचा राजीनामा घ्यावा आणि त्यांची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी.  परमबीर सिंग म्हणतात की, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार यांना जाणीव करुन दिली होती. हे सर्व असेल तर ठाकरे सरकार अशा गोष्टींना सरंक्षण देण्याचे काम करीत आहे. ही निषेधार्थ बाब आहे, असेही पाटील म्हणाले.