पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरू दे…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले श्री पांडुरंगाला साकडे

0
109

पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरू दे. भक्तिरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरू होऊ दे, यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) आषाढी एकादशीच्या महापूजेच्यावेळी श्री पांडुरंगाला घातले. या वेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्र्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. मानाचे वारकरी विणेकरी केशव शिवदास कोलते, जि. वर्धा  (वय ७१) यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तर सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते सौ. इंदुबाई केशव कोलते (वय ६६) यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना एसटीच्या मानाचे वारकरी या नात्याने देण्यात येणाऱ्या एक वर्षाचा मोफत पास मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला

मुख्यमंत्री म्हणाले की, पुन्हा एकदा सर्वांना आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे. कोरोनाच्या काळात नागरिकांच्यावतीने पाळण्यात येणारे सामाजिक मिटवू दे, वारकऱ्यांनी तुडूंब, आनंददायी, भगव्या पताक्यांनी भरलेलं पंढरपूर पहावयाचे आहे. आज मंदिरात मी वृक्षारोपण केले. हा परंपरेचा वृक्ष असून याची पाळेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

पंढरपूर नगरपरिषदेस राज्य शासनाच्यावतीने यात्रा अनुदानापोटी पाच कोटी रुपये रुपयांचा धनादेश  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. महापूजेनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गाहिनाथ औसेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, तर कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

या वेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव दिलीप पांढरपट्टे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते उपस्थित होते.