राज्यात रविवारपासून नाईट कर्फ्यू : मुख्यमंत्र्यांची घोषणा

0
488

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या अतिशय वेगाने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवार) मोठा निर्णय घेतला आहे. रविवारपासून म्हणजे २८ मार्चपासून राज्यात रात्रीची जमावबंदी घोषित करण्यात आली आहे. जनतेने कोविड – १९ चे नियम पाळले नाहीत तर नाइलाजाने पुढील कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्सचे सदस्य, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून कोविड स्थिती,  उपाययोजना जाणुन घेतल्या. त्यानंतर त्यांनी ही घोषण केली.  

राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी  काही कडक उपाययोजना लागू करणे  आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवार (२८ मार्च ) रात्रीपासून जमावबंदी लागू करण्यात येत आहे. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत अशीही सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.