मुंबई (प्रतिनिधी) : कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावले आहे. हुतात्मा दिनानिमित्त कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील शहिदांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आजच्या हुतात्मा दिनी विनम्र अभिवादन. सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग, समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबियांना मानाचा मुजरा..! कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण बेळगाव आणि सीमाभागासाठीची न्यायालयीन लढाई नक्कीच जिंकू. बेळगाव आणि सीमाभाग महाराष्ट्रात येईल, असा आम्हाला विश्वास आहे. सीमा लढ्यात तुरुंगवास भोगल्याने माझा आणि सहकारी सीमा भाग समन्वयक मंत्री छगन भुजबळ यांचे या लढ्याशी भावनिक नातं आहे. आम्ही हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही.