मुख्यमंत्री शिंदे यांच्या ३ घोषणा आणि तुफान फटकेबाजी

0
45

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील कर लवकरच कमी करण्यात येईल तसेच शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्याबरोबरच हिरकणी गाव वाचवण्याची नव्या सरकारतर्फे २१ कोटीचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केली. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सभागृहात केलेल्या भाषणात शिंदे यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या. तसेच यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केली.

जलयुक्त शिवार, सारथी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल करण्याचा संकल्प सरकारने केला आहे, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी  बंडखोर आमदारांच्या डोक्यावर बंदूक लावून त्यांना आमच्या गटात आणले नव्हते. हिंदुत्वाचा पुरस्कार करणार्‍या पक्षासोबत आम्ही गेलो. आपण आणि फडणवीस मिळून आगामी विधानसभा निवडणुकीत २००  जागा निवडून आणू, असा विश्वास व्यक्त केला. तसे जर झाले नाही मी शेती करायला निघून जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

माझ्यासोबत असलेल्या ५० पैकी एकाही आमदाराला पराभूत होऊ देणार नाही. देवेंद्र फडणवीस आणि आमचा अजेंडा सेम आहे. आमचे ५० आणि त्यांचे ११५ असे एकूण १६५ आमदार झाले आहोत. पुढील निवडणुकीत ते २०० करू, असा शब्दही त्यांनी दिला. शिवसेना सोडलेल्या नेत्यांना पुढे राजकीय भवितव्य नसल्याचे उदाहरण अजितदादांनी आपल्या भाषणात दिले होते. त्याला शिंदे यांनी उत्तर दिले.

शिंदे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे :

माझ्यासोबत अनेकजण सत्तेत मंत्री होते; परंतु ही मंडळी स्वतःचे मंत्रीपद दावावर लावून माझ्यासोबत आली. एकीकडे बलाढ्य सरकार, बलाढ्य नेते सत्ता यंत्रणा आणि दुसरीकडे एक सर्व सामान्य बाळासाहेबांचा शिवसैनिक होता. मी विधानभवनातून विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी बाहेर पडलो. तेव्हा माझा झालेला अपमान या विधानसभेतील अनेकांनी पाहिला. तेव्हाच मी बाळासाहेबांच्या विचारांनुसार अन्यायाविरूद्ध पेटून उठलो आणि माझ्यासोबत येणाऱ्यांना सोबत घेतले आणि निघालो.

सुनील प्रभूंना देखील माहिती आहे, माझं कशा पद्धतीने खच्चीकरण करण्यात आले. शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल; परंतु आता माघार नाही, हे मी ठरवले होते. एक ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवकही एकडे तिकडे जाताना मोठी तारांबळ होते. माझ्यावर नको नको ते आरोप करण्यात आले. अपमान केला, दुषणे दिली, बदनामी केली. इकडे मला चर्चेसाठी माणसं पाठवली आणि तिकडे मला गटनेते पदावरून काढून टाकली. पुतळे जाळले. आणि घरावर दगडफेक करण्याचे आदेश दिलेच; परंतु एकनाथ शिंदे यांच्या घरावर दगडफेक करण्याची हिम्मत करणारे अद्याप पैदा झालेले नाहीत.

३०  ते ३५  वर्षे मी शिवसेनेसाठी जिवाचे रान केले. बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावीत झालो. धर्मवीर आनंद दीघे साहेबांच्या सानिध्यात आलो. तेव्हा मी शाखाप्रमुख झालो. मी पहिल्यांदा ११९७ नगरसेवक झालो त्याच्या आधीच मी होऊ शकलो असतो. त्यावेळी तेथे युतीकडून भाजपचे नगरसेवक होते; परंतु आम्ही युती पाळली आणि ५  वर्षानंतर नगरसेवक झालो. पक्षासाठी मी घराकडेही लक्ष दिले नाही. मागे वळून पाहिले नाही. आता आमचे बाप काढण्यात आले, कोणी रेडा म्हणाले, कोणी प्रेत म्हणाले, आमच्यासोबतच्या महिला आमदारांना वेश्या म्हणाले. परंतु आमच्या तोंडून चुकीचे शब्द बाहेर पडले नाही.

अन्याय झाला की मला शांत राहता येत नाही. माझं रक्त अशावेळी सळसळ करते. यावेळी दीपक केसरकर यांनी माझे काम हलके केले. आमची भूमिका दीपक केसकर यांनी लोकांपर्यंत आणि मीडियापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवली. माझ्यावर दुःख कोसळले असताना दीघे साहेबांनी मला आधार दिला. नाहीतर मी जगणे विसरलो होतो.