मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या 6 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार-खासदार अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत.
मुख्यमंत्र्यांचा हा दौरा खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण सत्तांतरानंतर ते पहिल्यांदाच आपल्या आमदार-खासदारांसह अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अयोध्येतील महंतांनी दिलेल्या निमंत्रणाचा मान ठेवून आपण जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यादरम्यान नेमक्या काय-काय घडामोडी घडतात, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘अयोध्या हा आमच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच अयोध्येला जाऊ’, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. यापूर्वी शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के, भाऊ चौधरी, सुशांत शेलार अयोध्येत गेले होते. या तीनही नेत्यांकडून संध्याकाळी शरयू नदीवर आरती करण्यात आली होती.
महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदारांसह गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी सर्व आमदारांनी गुवाहाटी येथील कामाख्या देवीच्या मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले होते. नवे सरकार स्थापन झाल्यास आपण पुन्हा दर्शनासाठी येऊ, असा नवस त्यांनी केला होता. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी पुन्हा गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहे.