गुवाहाटी (वृत्तसंस्था) : काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाचे केंद्र ठरलेले आसामची राजधानी गुवाहाटी शहर हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदार आणि मंत्र्यांना घेऊन पुन्हा गुवाहाटी येथे उद्या शनिवारी संध्याकाळी जात आहेत.

बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सर्व आमदार, मंत्री कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी पहिल्यांदाच त्यांच्यासोबत शिवसेनेतून फुटलेले १२ खासदारही उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या आमदार आणि खासदारांना घेऊन उद्या संध्याकाळी मुंबईतून विशेष विमानाने गुवाहाटीला जाणार आहेत.

मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतरचा एकनाथ शिंदे यांचा आणि शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरचा १२ खासदारांचा हा पहिलाच दौरा आहे. उद्या संध्याकाळी सर्व आमदार, खासदार आणि मंत्री हे सर्वजण रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये उतरणार आहेत. या हॉटेलातील १०० खोल्या आरक्षित केल्या आहेत. गेल्यावेळीही याच हॉटेलात शिंदे गट उतरला होता. त्यामुळे पुन्हा याच हॉटेलात सर्व आमदार आणि खासदार उतरणार आहेत.

या हॉटेलपासून कामाख्या देवीचे मंदिर २० मिनिटांंवर आहे. रविवारी सकाळी सर्वजण या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या मंदिराभोवतीच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, आमदारांनी आजपासून गुवाहाटी दौऱ्याची तयारी सुरू केली आहे.