कुरुंदवाड (प्रतिनिधी) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी (दि. २५) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यादरम्यान सायंकाळी पाच वाजता आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या शरद साखर कारखान्याने उभारलेल्या डिस्टिलरी प्रकल्पाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होत आहे.

या कार्यक्रमास वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, खा. धैर्यशील माने, खा. संजय मंडलिक, खा. धनंजय महाडिक यांच्यासह सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर जयसिंगपूर येथे मुख्यमंत्री शिंदे नगरपरिषद व महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून झालेल्या विविध विकासकामांची पाहणी करणार आहेत.

जयसिंगपूर नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व म्युझियमच्या ठिकाणी भेट देतील. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता जयसिंगपुरातील विक्रमसिंह क्रीडांगणावर आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आयोजित केलेल्या जनसंवाद मेळाव्याला ते मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री दीपक केसरकर असतील. या जनसंवाद मेळाव्यास शिरोळ, हातकणंगले तालुक्यासह जिल्ह्यातून जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जनसंवाद मेळाव्याचे संयोजक आ. यड्रावकर यांनी केले आहे.