कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘सुपर न्यूमरी’ आणि मराठा समाजाच्या प्रश्नांसंदर्भात खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची बुधवारी (दि.२) मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे.

११ वी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजलेला आहे. खा. युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘सुपर न्यूमरी’ पद्धतीने SEBC एसईबीसीमधील मराठा विद्यार्थ्यांचा कशा पद्धतीने समावेश करण्यात येईल, याची स्पष्टता करण्यासाठी चर्चेची वेळ मागितली होती.

यानुसार मुख्यमंत्री ठाकरे व मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष अशोक चव्हाण यांची बुधवारी सायंकाळी ४ वाजता वर्षा बंगला येथे बैठक होणार आहे. या बैठकीस युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मराठा समाजाचे समन्वयक व अभ्यासक उपस्थित राहणार आहेत. सध्या सुरू असणाऱ्या शैक्षणिक प्रवेश प्रवेश प्रक्रिया अनुषंगाने या बैठकीकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.