ताराराणी राजवाडा दीपोत्सवात उजळला

0
187

पन्हाळा (प्रतिनिधी) : सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत करत शिवप्रेमी व जिजाऊ लेकीच्या उदंड सहभागाने ताराराणी राजवाड्यात दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय क्षत्रिय जन संसदचे सभापती महेश पाटील-बेनाडीकर यांच्या संकल्पनेतून पन्हाळा गिरीदुर्ग नगरपरिषद आणि पन्हाळगड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला जागतिक शस्त्रात्रे संग्राहक व अभ्यासक गिरीश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विकास मोहिते होते. तर विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध काव्य लेखक सुजय देसाई होते. अध्यक्षस्थानी पन्हाळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष रुपली धडेल होत्या.

महेश पाटील -बेनाडीकर म्हणाले की, करवीर राज्य संस्थापिका छत्रपती ताराराणी यांचे कर्तुत्व लाखमोलाचे आहे. त्या अवघ्या स्त्रीजातीचे प्रेरणास्रोत आहे.त्याचा शौर्यसाली जाज्वल्य  इतिहास जागृत ठेवण्यासाठीच व ताराराणी राजवाड्याला महत्व प्राप्त करून देण्यासाठीच दीपोत्सव सोहळ्याची संकल्पना आहे.

नगराध्यक्षा रुपालीताई धडेल म्हणाल्या की, छत्रपती ताराराणी यांचा जाज्वल्य इतिहास पोहोचण्यासाठी नगरपरिषद आपल्याला सर्वोतोपरी साह्य करेल. तसेच पन्हाळा नगरपरिषदेच्या वतीने महाराणी ताराराणींचा पुतळा लवकरच बसवू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

नितीन फाले यांनी स्वागत केले. संदीप काशिद यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन महेश कुर्हाडे, रमेश स्वामी, पृथ्वीराज भोसले, नितीन फाले यांनी केले. यावेळी स्वाती पिसाळ -कराड, प्रतापराव गुर्जर यांचे वंशज सचिन गुर्जर- सरनौबत, शाहूराज डफळे-उमराणी (जत), सुधीर सांळुखे (पुणे), राहुल निंबाळकर (इचलकरंजी) आदीसह ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.