‘ओबीसी आरक्षण बचाव’साठी उद्या राज्यात आक्रोश मोर्चा : छगन भुजबळांची घोषणा

0
79

नाशिक (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग वाढत असताना आता ओबीसी आरक्षण बचाव असा नारा देत राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्या राज्यभरात समता परिषदेतर्फे आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. यामुळे राज्य सरकारसमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये  छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी आज (बुधवार) बैठक पार पडली. या बैठकीत ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. ओबीसींना आरक्षण द्यायचे तर डाटा आणि जनगणना हवी. तसेच फडणवीस सरकारनेही केंद्र सरकारने याबाबत डाटा मागितला, पण केंद्र सरकारने तो दिला नाही. आमचे सरकार आले आणि लॉकडाऊन लागले. त्या काळात कोण कुणाला भेटत नव्हते. आणि अचानक ४ मार्चला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला. त्यामुळे समता परिषदेचे आंदोलन हे ओबीसी आरक्षण बचाव यासाठी आहे. राज्य सरकार अथवा केंद्र सरकार असेल, कोणीही यावर मार्ग काढावा यासाठी ओबीसी समाज आंदोलन करणार आहे. इतर समाजही आंदोलन करत आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी आमची मागणी असल्याचे भुजबळ यांनी या वेळी स्पष्ट केले.