राधानगरी (प्रतिनिधी) :  राधानगरी तालुक्यातील गवशीपैकी पाटीलवाडी येथे मुलाच्या वाढदिवसानिमित्त विनापरवाना क्रिकेट स्पर्धा भरवल्या. क्रिकेट सामन्यांदरम्यान   शिवारात ‘चिअर्स गर्ल्स’ आणून  धिंगाणा  घातल्याप्रकरणी मुलाच्या वडिलासह तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.  रघुनाथ दिनकर पाटील (रा.गवशीपैकी पाटीलवाडी ता. राधानगरी) असे गुन्हा दाखल झालेल्या वडिलाचे नांव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रघुनाथ पाटील यांने आपला मुलगा भैरवनाथ याच्या वाढदिवसानिमित्त पाटीलवाडी गावाच्या  शिवारात विनापरवाना क्रिकेट स्पर्धेचे आयोजन  केले होते. विशेष म्हणजे क्रिकेट सामन्यासाठी ‘चिअर्स गर्ल्स’ आणल्या होत्या. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी तरुणांनी शिवारात मोठी गर्दी केली होती. गाण्याच्या ठेक्यावर ‘चिअर्स गर्ल्स’नी  नाचायला सुरवात केल्यानंतर तरुणांनीही ‘चिअर्स गर्ल्स’चा हात पकडून नाचायला सुरुवात केली. हा प्रकार तीनचार  तास सुरू होता.

याची माहिती पोलिसांना मिळताच शिवारातून  तरुण आणि ‘चिअर्स गर्ल्स’ यांनी धूम ठोकली. दरम्यान, कोरोना मार्गदर्शन सूचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संयोजकांसह ‘चिअर्स गर्ल्स’ आणि तरुणांवर राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.