कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी खासदार संभाजीराजे यांचे नेतृत्वाखाली उद्या बुधवार १६ जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधिस्थळ येथे मूक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी आज (मंगळवार) खास आदेश काढून उद्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आदेशात म्हटले आहे की, समाधीस्थळाच्या  मार्गावर नमूद वेळेत अवजड वाहनांना प्रवेश बंद आहे. अत्यावश्यक सेवेतील पोलीस अॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड यांची वाहने यातून वगळण्यात आली आहेत.

रत्नागिरी रोडवरून छ. शिवाजी महाराज पुलाकडून शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना वडणगे फाटा [पश्चिम) येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर ठिकाणाहून कोल्हापूर शहरात येणारे तसेच शहराचे बाहेर जाणारे जड़, अवजड वाहनांनी वडणगे फाटा (पश्चिम) येथून वडणगे, निगवे, शिये मार्गे महामार्गाकडे पुढे मार्गस्थ व्हावे. गगनबावडा कडून येणारे जड अवजड वाहनांना फुलेवाडी नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत असून सदर वाहनांनी फुलेवाडी नाका येथून रिंग रोड मार्गे पुढे मार्गस्थ व्हावे. राधानगरीकडून येणाऱ्या जड अवजड वाहनांना क्रशर चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत असून सदर वाहनांनी संभाजीनगर मार्गे पुढे मार्गस्थ व्हावे. महामार्गावरून तावडे हॉटेल मार्गे शहरात प्रवेश करून रत्नागिरीला जाणाऱ्या अवजड वाहनांना ताराराणी चौकात प्रवेश बंद करण्यात आला असून सदर वाहनांनी धैर्यप्रसाद चौक, सर्किट हाऊस, कसबा बावडा मार्गे पुढे शिये, भुये, निगवे, वडणगे मार्गे रत्नागिरीकडे मार्गस्थ व्हावे.

  • दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी सूचना 

रत्नागिरीकडुन छ. शिवाजी पुलमार्गे कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे चार चाकी व दुचाकी वाहनांना डी.वाय.एस.पी. ऑफिस चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत असून सर्वांनी निकम गल्लीमार्गे तसेच सोन्या मारुती मंदीराजवळून जाणारे मार्गावरून पुढे मार्गस्थ व्हावे. कसबा बावडा मार्गे कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे चार चाकी व दुचाकी वाहनांना जुने वाहतूक ऑफिस येथे प्रवेश बंद करण्यात आला असून सदर वाहनांनी दसरा चौक मार्गे पुढे मार्गस्थ व्हावे. दाभोळकर सिग्नल व व्हिनस सिग्नल मार्गे सीपीआर चौक कडे पुढे येणारे सर्व प्रकारचे वाहनांसाठी दसरा चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत असून सदर वाहनांनी कोंडा ओळ व फोर्ड कॉर्नर मार्गे मार्गस्थ व्हावे. कोल्हापूर महानगरपालीका कडून सीपीआरकडे येणारे सर्व प्रकारचे वाहनांसाठी दै. पुढारी ऑफिस चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत असून सदर वाहनांनी माळकर सिग्नल व सारस्वत बँक येथून राणाप्रताप चौक मार्गे पुढे मार्गस्थ व्हावे.