नवी दिल्ली  (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट   मधील नियमांमध्ये बदल केल्याने १ डिसेंबर २०२० पासून कॅश ट्रान्सफर संदर्भातील काही नियमामध्ये बदल होणार आहेत. त्यानुसार  आता २४ तास  आरटीजीएस सुविधेचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे.

सध्या आरटीजीएस सिस्टीम महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार व्यतिरिक्त आठवड्यातील कामकाजाच्या वेळी सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी ६ पर्यंत उपलब्ध होती. पण आता सातही दिवस या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. मोठे व्यवहार, मोठे फंड ट्रान्सफर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आरटीजीएस, एनईएफटी,   आयएमपीएस आदी पर्याय उपलब्ध आहेत. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये एनईएफटी २४ तास सुरु केली होती. आता  आरटीजीएस सेवा सात दिवसही उपलब्ध करून देण्यात आली आहे.  भारतीय वित्तीय बाजाराच्या जागतिक एकत्रीकरणाचे उद्दीष्ट, भारतात आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रे विकसित करण्याचा प्रयत्न आणि देशीय कॉर्पोरेट्स आणि संस्थांना मोठ्या प्रमाणात देय लवचिकता प्रदान करण्यासाठी चालू असलेल्या कार्यास पाठिंबा देण्याच्या हेतूने हा निर्णय घेतला आहे.