राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराच्या नावात बदल…

0
232

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मागील अनेक वर्षांपासून केंद्र सरकारतर्फे क्रीडा विश्वात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ या सर्वोच्च पुरस्काराने गौरवले जाते. या पुरस्काराच्या नावात बदल करण्यात आला आहे. हा पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार  या नावे देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) ट्वीटरद्वारे केली आहे.  

‘या पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी अनेक नागरिकांनी केली होती. त्यांच्या मागणीचा आदर ठेवत राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव यापुढे ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’  असे असेल. जय हिंद ! असे त्यांनी म्हटले आहे.

खेलरत्न पुरस्काराची सुरुवात १९९१-९२ साली करण्यात आली. महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद हा या पुरस्काराचा पहिला मानकरी ठरला. आजवर सचिन तेंडुलकर, पी. गोपीचंद, अभिनव बिंद्रा, धनराज पिल्ले, मेरी कोम, राणी रामपाल, अंजू बेबी जॉर्ज, लिएंडर पेस यांसारख्या दिग्गज खेळाडूंना या पुरस्कारानं गौरवण्यात आले आहे.

मेजर ध्यानचंद हे भारताच्या त्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक होते की, आपल्या अप्रतिम कामगिरीने त्यांनी देशाचा गौरव वाढवला. त्यांनी १९२६ ते १९४९ या कालावधीमध्ये तब्बल ४०० आंतरराष्ट्रीय गोल केले. १९२८, १९३२ आणि १९३६ साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघाचे ते सदस्य होते.