मुंबई (प्रतिनिधी) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर शिवसेनेने जोरदार टीकास्त्र सोडले आहे. चंद्रकांतदादांचे पत्रलेखन हे उकळल्या किटलीतील रटरटत्या चहासारखे आहे. दादांनी पत्र लिहिणे म्हणजे सगळ्यांचीच दाणादाण उडणार. पुन्हा भाषाशुद्धीची मोहीम त्यांनी सुरुच केली आहे, असा टोला शिवसेनेने लगावला आहे. महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभला असल्याचे शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत. पण चायपेक्षा किटली गरम असे काही लोकांचे सुरु आहे. उठसूट फक्त विरोध, दुसरे काही नाही. मुंबईतील महाकाली गुंफा विकू देणार नाही, एक इंचही जागा बिल्डरांच्या घशात घालू देणार नाही अशा विरोधी पक्षाच्या उकळ्या काही किटल्यांना फुटल्या आहेत. भाजपच्या ध्यानीमनी, स्वप्नी बिल्डर आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही निर्णयात बिल्डरच दिसत असावेत. राज्य सरकारने कोणताही निर्णय घ्यायचा म्हटले की, ब्लॅकमेल करणारी किरकिराटी मांजरे आडवी घालायची, हे जणू धोरणच झाले आहे.

चंद्रकांत पाटील हे हल्ली वाचकांची पत्रे, तक्रारी सूचना वगैरे सदरांखाली पत्र लिहून अनेक विषयांना वाचा फोडतात. भाजपमध्ये नवे तर्खडकर उदयास आले असून संपूर्ण भाजपला त्यामुळे गलिच्छ विचार आणि भाषेला तिलांजली द्यावी लागेल. काही चुकीचे बोललात की, पत्रलेखक पाटील त्यांची कागदी तलवार सपकन बाहेर काढतील व तक्रारी सूचना सदरात वार करतील. महाकाली गुंफा प्रकरणाचेही चिंतन व संशोधन करुन त्यावर पत्ररूपी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी चंद्रकांत पाटलांवर येऊन पडली आहे. कारण भाजपातील किटल्या उकळत असल्या तरी त्या नको तिथून गळतही आहेत. या गळतीची तक्रार पाटलांनी तत्काळ पत्र लिहून राष्ट्रीय नेतृत्त्वाकडे करायला हवी, असे शिवसेनेने म्हटले आहे.