कोल्हापूर (प्रतिनिधी) : चंद्रकांतदादा पाटील यांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. त्यांना कोल्हापूरमधून निवडून न आल्याबद्दल आम्ही टीकाही केली नव्हती, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. चंद्रकांतदादांनी राज्यपाल नियुक्त विधान परिषदे च्या बारा जागासंदर्भातील माझ्या वक्तव्याला पुष्टीच दिली आहे,  असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे  की,  विधानसभेच्या निवडणुका होऊन एक वर्ष झालेले आहे. विधानसभा निवडणुकीला अजून चार वर्षे शिल्लक आहेत. भाजपचा एकही आमदार कोल्हापूरमध्ये निवडून आलेला नाही, त्यामुळे राजीनामा कोण देणार ? कशासाठी?  हे होणार नाही, हे दादांना माहित आहे. तसेच ज्या कोथरुडमधून आपण आमच्या मेघा कुलकर्णी ताईंना डावलून निवडून आला आहात, तिथे भाजप पक्षही परवानगी कशी देईल?  दोन्हींही गोष्टी केवळ अशक्य आहेत. त्यामुळे दादांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आम्हांला तुमची येथेच गरज आहे.

मी दादांचे मनापासून आभार मानतो,  कारण सन्माननीय राज्यपाल व सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यामधील चर्चेबाबत वारणेवर दादा यांनी जे वक्तव्य केले होते. त्याचा स्पष्ट इन्कार त्यांनी केलेला नाही. दुपारी १२ वाजता माझी पत्रकार परिषद झाली. त्यावेळी पुण्यामध्ये दादांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले,  राज्यपालांना संविधानातील अधिकार आहेत ते तसे करू शकतात. म्हणजे, त्यांच्या त्या वक्तव्याची त्यांनी पुष्टीच केली. तसेच संध्याकाळी पण त्यांनी मुश्रीफांचे विधान हास्यास्पद आहे,  असे दादांनी वक्तव्य केले. त्याबद्दल त्यांनी असे विधान आपण स्वतः केलेले नाही,  मुश्रीफ खोटे बोलत आहेत किंवा त्या भागातील जागृत देवस्थान श्री. जोतिबाची शपथ घेतो, असे काहीही म्हटलेले नाही. दादांचा तो स्वभावही नाही. एकूणच काय  तर माझ्या वक्तव्याला चंद्रकांत दादानी पुष्टी दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.