शहा-पवार यांची भेट न झाल्याचे सांगण्याची ‘त्यांच्या’ नेत्यांमध्येच स्पर्धा : चंद्रकांतदादांचा टोला

0
209

पुणे (प्रतिनिधी) :  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कथित भेटीच्या वृत्तानंतर काल दिवसभर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्याचे पडसाद आजही उमटत आहेत. शरद पवार आणि अमित शाह यांच्यात नक्की भेट झाली का, हे मला माहिती नाही. पण अमित शाह यांनी काल केलेलं वक्तव्य पाहता ही भेट झाली असावी. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अशी भेट झालीच नाही, हे सांगण्याची स्पर्धा लागली आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी लगावला. ते आज (सोमवार) पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कार्यकर्त्यांमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार आहे, अशी चर्चा असल्याच्या प्रश्नावर त्यांनी हे सूचक विधान केले. राजकारण हे राजकारणाच्या जागी असतं. मात्र, नेत्यांनी एकमेकांना भेटलं पाहिजे. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार आल्यापासून अशा भेटीगाठी कमी झाल्या होत्या. अमित शाह आणि शरद पवार यांची भेट राजकीय कारणासाठी होते, असे नाही. त्यामागे एखादे समाजोपयोगी कारणही असू शकते. अमित शाह यांना भेटण्याची वेळ रात्रीचीच असते. ती निवांत भेट असेल. पण शरद पवार अहमदाबादला जाऊन अमित शाह यांना निवांतपणे का भेटले, याचा विचार झाला पाहिजे. परंतु, नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असेही  चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.