पुणे (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत सत्ता आणण्याचा चंग भाजपने बांधला आहे. नुकत्याच झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये मुंबई महापालिकेवर भाजप झेंडा फडकेल, असा विश्वास विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी व्यक्त केला. मागल्या वेळेस पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले म्हणून आम्ही मुंबई महापालिकेत सत्तारूढ होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, आता मात्र तसे होणार नाही, असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. ते आज (शनिवार) पुण्यात मध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.  

मुंबई महापालिकेत शिवसेनेला दणका देण्याचे भाजपचे नियोजन आहे. केवळ मुंबईच नाही, तर अन्य महापालिकांमध्येही भाजपचाच महापौर सत्तेवर आणण्याचे उद्दिष्ट आहे आणि आम्ही यश संपादन करू, असे फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यांचीच री ओढत चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले की, आम्ही मुंबई महानगरपालिका भाजपाकडे घेणार आहोत. मागच्या वेळी आम्ही जेव्हा ८२ जागा जिंकलो त्यावेळी महापौर आमचाच बसला असता. परंतु अमित शाह यांनी आपल्याला राज्य चालवायचं असून मुंबई महानगरपालिका शिवसेनेला सोडा असं सांगितलं होतं. शिवसेनेचे ८४ आणि आमचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. आमचे केवळ दोन नगरसेवक कमी होते.