चंद्रकांतदादांची मतदारांना सोन्याचा मुकुट, गावजेवणाचीही ऑफर…

0
264

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  सांगलीत राष्ट्रवादीच्या नेत्याला पाडा आणि सोन्याचा मुकुट मिळवा. नांदेडमध्ये भाजपला सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त मतदान द्या आणि गावजेवण मिळवा. अशा ऑफरवर ऑफर देत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राज्यभर फिरत आहेत. या त्यांच्या ऑफर्स गांभिर्याने घेणार की चेष्टेचा विषय होणार याची चर्चा सुरु आहे.

निवडणूका असो नसो राज्यात भाजपला मात्र कायम निवडणूक आणि सत्तेचे वेध लागलेलेच आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना तर सर्वत्र निवडणूकीचेच वातावरण दिसत आहे. यामुळेच ‘मी पुन्हा येईन’, ‘मी गेलोच नाही’, ‘अजूनही मुख्यमंत्री मी’ अशी वाक्ये फडणवीस यांच्याकडून अनेक सभासमारंभात ऐकायला मिळतात.

तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील जनतेला ऑफर्सवर ऑफर्स देण्याचा सपाटा लावलाय. सांगलीत त्यांनी राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा पराभव करण्याऱ्याला सोन्याच्या मुकुटाची ऑफर दिली. तर नांदेडमध्ये भाजपला सत्तर टक्के मतदान देणाऱ्या गावांना गावजेवणाची ऑफर दिली. त्यामुळे आता चंद्रकांत पाटील यांची पुढची ऑफर काय आणि ती कोणत्या जिल्ह्यात याची चर्चा सुरू आहे.

सध्या कोणत्याही निवडणूकीची आचारसंहिता नाही. त्यामुळे चंद्रकांतदादांच्या या ऑफर्स जनता किती गांभिर्याने घेणार आणि निवडणूक आयोग काय दखल घेणार याचीही उत्सुकता लागून राहिली आहे.