मुंबई  (प्रतिनिधी) :  भाजप प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांना सक्रिय राजकारणातून बाजूला करून नागालँडच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  

राऊत म्हणाले  की, राजकीय जीवनात आम्ही एकमेकांवर टीका करत असलो, तरी चंद्रकांत पाटील हे आमचे मित्र आहेत. माजी मंत्री म्हणवून घेणं त्यांना आवडत नाही. त्यांची वेदना आम्ही समजू शकतो. चित्र बदलेल अशा आशेवर ते आहेत. पण पुढची २५ वर्षे तुम्हाला माजी मंत्री म्हणूनच राहावं लागेल,  असा निरोप मी त्यांना पाठवला आहे.  पाटील हे काही स्वप्न पाहत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे. स्वप्न बघण्यावर आपल्या देशात अद्याप टॅक्स किंवा जीएसटी लागलेला नाही, असा टोलाही राऊत यांनी पाटील यांना लगावला.

पाटील यांची नागालँडच्या राज्यपालपदी नियुक्ती होतेय, असे माझ्या कानावर आले आहे. कदाचित म्हणूनच मला माजी मंत्री म्हणू नका, असे पाटील बोलले असतील, असे राऊत यांनी यावेळी सांगितले.