मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री  अमित शहा यांच्या गुप्त भेटीच्या वृत्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या भेटीवरून अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या   भेटीवर शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. सध्या पवार थोडे आजारी आहेत. त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया होत आहे, पण वैफल्य व निराशा यामुळे पित्त खवळले आहे ते भाजपाचे. पवार लवकरच बरे होऊन कामास लागतील. भाजपानेही गुप्त आजारातून लवकरात लवकर बरे व्हावं, असे शब्दांत शिवसेनेने भाजपला टोला लगावला आहे.

पवार-शहांची भेट झाली नाही. त्या न झालेल्या भेटीबद्दल अहमदाबादेत स्वतः अमित शहा यांनी पतंग उडवले. पत्रकारांनी त्यांना भेटीबद्दल विचारले तेव्हा शहा म्हणाले, ”अशा गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात.”महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील वगैरे नेते तर त्याच पतंगाच्या मांजावरून इतके वर गेले की, ”मोदी-शहा, नड्डा घेतील तो निर्णय आपल्याला मान्य,” असे सांगून आणखी एका पहाटेच्या शपथविधीच्या स्वप्नरंजनात दंग झाले. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार आलेच अशा थाटात काहीजण वावरू लागले. शरद पवार यांनी शहांची भेट घेतली की नाही हा प्रश्न सोडा, पण विरोधी पक्ष सत्तेसाठी कसा उतावीळ होऊन वळवळ करीत आहे, ते या निमित्ताने दिसले. जसे महाराष्ट्रात ठाकरे सरकार मजबूत आहे, तसे भाजपाचे विरोधी बाकांवरील स्थान बळकट आहे. त्यामुळे कोणत्याही गुप्त बैठका किंवा खलबतांमधून ठाकरे सरकारला सुरुंग लागेल व विरोधी बाकांवरून सत्ताधारी बाकांवर जाता येईल. या भ्रमातून विरोधकांनी बाहेर पडले पाहिजे. पुन्हा भल्या पहाटे मिठाचा खडा टाकून दूध नासवायचा प्रयत्न एकदा भलेही झाला, मात्र आता तसा काही नासवानासवीचा प्रकार होऊ शकणार नाही. एक वेळ दुधात पडलेला मिठाचा खडा बाहेर काढता येईल, पण गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे दूर होणे कठीण, असा सध्याचा सिद्धांत आहे, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.