अरुण लाडांबाबत चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला प्रश्न  

0
92

सांगली (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरूण लाड यांचे वय ७२ आहे. इतक्या वयात ते पाच जिल्ह्यात कसे पोहचणार असा प्रश्न आहे. आम्हाला काहीच दिले नाही, असे सारखी तक्रार करणाऱ्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. हे घ्या, एकदाचे तुम्हाला दिले, असे सांगण्यापुरतेच ते उमेदवार आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. 

भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ इस्लामपूर येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

पाटील म्हणाले, राष्ट्रवादी कॉँग्रेसने उमेदवारी देताना विजयाची खात्री नसल्याने लाड यांची निवड केली आहे. कारण, अनेकजण अपेक्षा ठेवून असतात. अशा जागी उमेदवारी दिली की सांगायला बरे पडते, तुम्हाला आम्ही संधी दिली. पण, तुम्ही पडलात, आता आम्ही काय करू? असा प्रकार आहे. आमचा उमेदवार तरुण आहे, ४७ वर्षांचा आहे. कामाचा माणूस आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आहे. देशाचे आणि राज्याचे मानाचे पुरस्कार जिंकले आहेत. असा कामाचा माणूस आमदार झाला तर आपल्याला, विकासाला गती देता येईल.