चंद्रदीप नरकेही शिंदे गटात ?

0
1084

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके हे ही एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील आहेत का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचे कारणही तसेच आहे. खा. संजय मंडलिक यांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेमध्ये नरके यांचाही हात असल्याची कबुली ‘लाईव्ह मराठी’शी बोलताना दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेपासून फारकत घेतल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील राजेश क्षीरसागर आणि आता जिल्ह्यातील दोन्ही खासदार संजय मंडलीक आणि धैर्यशील माने या तिघांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. क्षीरसागर हे पहिल्यापासूनच शिंदे गटाबरोबर आहेत. तर दोन्ही खासदारांनी मात्र, थोडावेळ घेऊन आज (मंगळवार) शिंदे गटात जाण्याच्या निर्णयावर शिक्का मोर्तब केले आहे. वास्तविक ज्यावेळी क्षीरसागर शिंदे गटामध्ये गेले त्यावेळी खा. मंडलिक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर टिकेची झोड उठवली होती. यामुळे जिल्ह्यातील एकमेव क्षीरसागरच शिंदे गटाकडे जातील असे चित्र त्यावेळी होते.

यासर्व घडामोडीत शिवसेनेचे माजी आमदार सुजित मिणचेकर, सत्यजीत पाटील-सरुडकर, उल्हास पाटील यांनी उघडपणे मूळ शिवसेनेत असल्याचे स्पष्ट केले आहे. या सर्व धामधुमीपासून माजी आमदार चंद्रदीप नरके मात्र लांबच राहिले आहेत. त्यांनी दोनही बाजूंकडे हजेरी न लावता रितसरपणे स्वतःला या वादापासून बाजूला ठेवले आहे. आपली भूमिका त्यांनी अद्यापही स्पष्ट केली नाही. पण, आज खासदार संजय मंडलिक यांनी लाईव्ह मराठीशी बोलताना ओघामध्येच शिंदे गटामध्ये सहभागी होण्यामागे मी फक्त कागल तालुक्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा न करता चंद्रदीप नरके आणि आमदार आबिटकर  यांच्याशीही चर्चा करुन निर्णय घेतला आहे. अशी कबुली त्यांनी दिली आहे.

खासदार मंडलिकांच्या या कबुलीमुळे एक गोष्ट मात्र अधोरेखीत केली आहे. माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी जरी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली असली तरी त्यांच अप्रत्यक्ष झुकतं माप शिंदे गटाकडे असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे येत्या काही कालावधीत नरके यांनी शिंदे गटाला जाहीरपणे पाठिंबा व्यक्त केला तर आश्चर्य वाटायला नको.