…तोवर काम बंद आंदोलन सुरूच राहणार : चंदगड पंचायत समिती कर्मचाऱ्यांचा इशारा

0
82

चंदगड (प्रतिनिधी) : चंदगडचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांच्यावर खोटी तक्रार दाखल करून चंदगड पंचायत समिती कार्यालयाची नाहक बदनामी केली जात असल्याचा आरोप करीत पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन पंचायत समितीमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज (शुक्रवार) जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत बेमुदत काम बंद ठेवले जाईल असाही इशारा देण्यात आला आहे.

हेरे येथील रमाकांत गावडे हे आपल्या न्याय मिळावा म्हणून १६ ऑक्टोबरपासून चंदगड पंचायत समितीसमोर उपोषणास बसले आहेत. दोनच दिवसापूर्वी संध्याकाळच्या सुमारास त्यांना बेदम मारहाण झाल्याचा प्रकार घडला असून ती मारहाण गटविकास अधिकारी आणि इतर काहीजणांच्या सांगण्यावरून केल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दिली आहे. या प्रकरणाशी पंचायत समितीचा कोणताही संबंध नसल्याचे वेळोवेळी स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी रमाकांत गावडे यांच्यावर कारवाई करून पंचायत समितीची बदनामी थांबवावी असेही या निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर पी. जी. कुलकर्णी, आर. के. खोत, एस. एस. सावळगी, एस. एस. सुभेदार, आर. बी. गाजलवाड, संतोष जाधव यांच्यासह पंचायत समिती चंदगडमधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सह्या आहेत.