चंदगड जमिन हडप प्रकरण : प्रजासत्ताकची मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी

0
336

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  चंदगड तालुक्यातील हेरे सरंजाम इनाम जमिनीच्या सातबारामध्ये बेकायदेशीर खाडाखोड करुन शेकडो एकर जमीन धनदांडग्यांच्या खिशात घातल्या आहेत. यावर सर्वप्रथम ‘लाईव्ह मराठी’ने आवाज उठवला होता. या प्रश्नाबाबत ‘लाईव्ह मराठी’ ने आवाज उठवल्यामुळे कोल्हापुरातील अनेक संघटना सक्रीय झाल्या आहेत. कोल्हापुरच्या प्रजासत्ताक समाजिक सेवा संस्थेच्या अध्यक्ष दिलीप देसाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून या प्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

पत्रात म्हटले आहे की, चंदगड तालुक्यातील हेरे सरंजाम इनाम जमिनीच्या सातबारा पत्रकात बेकायदेशीर खाडाखोड केली आहे. अशा शेकडो एकर जमिनी धनदांडग्यांच्या खिशात घातल्या आहेत. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने जानेवारी २०२० मध्ये गुन्हा दाखल झाला होता. परंतु, कोरोनाच्या कालावधीत या गुन्ह्याचा तपास पुढे झालाच नाही. आता हा तपास नव्याने सुरु झाला असून या गुन्ह्यांमध्ये असणाऱ्या आरोपींसोबतच इतर काही वरिष्ठ महसूल अधिकारी सामिल असण्याची शक्यता आहे. हा प्रकार केवळ चंदगड तालुक्यात घडला नसून अनेक ठिकाणी घडले असण्याची शक्यता आहे.

त्यामुळे असे गुन्हे आणखी कुठे घडले आहेत का याची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी. महसूल विभागातील सरकारी जमिनीच्या संबंधीत व्यवहारांची सर्व निकष चौकशी करावी. जमिनीची बेकायदेशीररित्या विल्हेवाट लावणाऱ्या जबाबदार अधिकारी आणि संबंधीत संघटीत गुन्हेगारांच्या विरुद्ध कडक कारवाई करावी. अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.