कोल्हापूर (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यातील शासकीय जमीन घोटाळ्याप्रकरणी पाच आरोपींना अटक झाली, मात्र, उच्चभ्रू डॉक्टरला अटक झालेली नाही. आता मात्र खुद्द डॉक्टरांनी गडहिंग्लज येथील न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रचंड दबाव आल्याने अटक अटळ असल्याचे लक्षात आल्याने अटकपूर्व जामिनासाठी त्यांना कुणीतरी सल्ला दिला असावा, अशी चर्चा आहे. अन्यथा, मागील वर्षभर त्यांनी यासाठी का प्रयत्न केले नाहीत ?

वास्तविक, या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन एक वर्ष उलटले आहे. यामध्ये सहभागी असणाऱ्या पाचजणांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या उच्चभ्रू डॉक्टरला काही केल्या अटक होत नव्हती. अटक करण्याइतपत सबळ पुरावे पोलिसांना वर्षभरात सापडले नाहीत की काय ? एखाद्या गुन्ह्यात सर्वसामान्य माणूस सापडला तर तातडीने अटक केली जाते. इथे मात्र, ‘सौजन्य सप्ताह’ असल्यासारखे पोलिसांचे वर्तन का राहिले हे अजूनही गुलदस्त्यात राहिले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना यासंबंधी विचारले असता त्यांनी कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे सांगून वेळ मारून नेली. तत्पूर्वी अटक करण्यासाठी योग्य ते निकष पूर्ण होतात की नाही, पुरेसे पुरावे आहेत हे पाहून कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पण या प्रकरणातील उर्वरित संशयित आरोपींना अटक होते, इतकेच काय त्यांना पोलीस कोठडीही मिळते. मग या डॉक्टरसाहेबांवरच पोलिसांची इतकी मेहेरनजर का, असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, यातील अटकेची कारवाई झालेल्या एकाही आरोपीला अटकपूर्व जामीन मिळाला नाही. आता पोलीस आणखी किती दिवस डॉक्टरसाहेबांवर ‘मर्जी’ ठेवतात हेच पाहावे लागेल.  

डॉक्टरांना अटक व्हावी, यासाठी कृती समितीनेही इशारा दिला होता. एकूणच सर्वच बाजूने कारवाईसाठी दबाव वाढल्याने पोलिसांनी कारवाईची हालचाल सुरू केल्यानेच अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी गडहिंग्लज येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश – १ यांच्या न्यायालयात २२ मार्च रोजी धाव घेतली आहे. त्याचा फाईल नंबर ५५/२०२१ असा आहे. २७/३०२१ असा रजिस्ट्रेशन क्रमांक असून पहिली सुनावणीही झाली आहे. कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर ४३८ नुसार हा अर्ज केला आहे. त्याचा सीएनआर नंबर – एमएचकेओ ०८०००१८८२०२१ असा आहे.

या जमीन हडप प्रकरणी आयपीसी ४१८, ४२०, ४६६, ४६७, ४६८, २०१ व ३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. डॉक्टरांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर युक्तिवाद सुरू असून पुढील सुनावणी ३ एप्रिल रोजी होणार आहे. डॉक्टरांच्यावतीने अॅड. एस. व्ही. राणे बाजू मांडत आहेत. एकूणच हे प्रकरण प्रतिष्ठेचे बनले असून ‘उच्चभ्रू डॉक्टर’ला सर्वसामान्य आरोपीप्रमाणे अटक होणार की नाही, याची उत्सुकता चंदगडवासीयांमध्ये लागून राहिली आहे.