‘चंदगड शासकीय जमीन’ हडप प्रकरण : मुख्य संशयित डॉक्टर अद्यापही मोकाट

0
5475

कोल्हापूर (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यातील शेकडो एकर शासकीय जमीन हडपप्रकरणी एक मुख्य आरोपी वगळता इतर सर्व आरोपीवर अटकेची कारवाई झाली आहे. तो मुख्य आरोपी अद्याप मोकाट असून त्याच्यावर पोलिसांची मेहरनजर का? वास्तविक याबाबतचे वृत्त ‘लाईव्ह मराठी’ने प्रसिध्द करताच कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात खळबळ माजली. या प्रकरणातील संबंधित मुख्य आरोपी शहरातील प्रतिथयश मेंदूचा डॉक्टर आहे. म्हणून त्याला कायद्यातून सवलत दिली जात आहे का? त्याच्या बाबतीत अजूनही पोलीस माहिती देण्यास टाळाटाळ का करत आहेत? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

चंदगड तालुक्यातील सडेगुडवळे आणि पुंद्रा या गावातील तब्बल साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप केल्याच्या प्रकरणावर ‘लाईव्ह मराठी’ने आवाज उठविला. या वृत्ताची सर्वत्र चांगलीच चर्चा झाली. संबधित डॉक्टर कोण यावर जिल्ह्यात तर्कवितर्क लढविले जाऊ लागले.  एक डॉक्टर आणि एक निवृत्त पोलीस कर्मचारी यांच्या नावावर या जमिनी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेने केला. यातील दोनशे एकर जमीन नावावर असलेला डॉक्टर दोन नंबर संशयित आरोपी तर त्यापेक्षा कमी जमीन नावावर असलेला निवृत्त पोलीस कर्मचारी क्रमांक एकचा संशयित आरोपी आहे. या प्रकरणाच्या तपासानंतर यात एक तलाठी आणि रेकॉर्ड विभागातील दोन कर्मचारी तसेच आणखी दोन एजंट व तो प्रसिद्ध डॉक्टर असे एकूण सात संशयित आरोपी स्पष्ट झाले आहेत.

या प्रकरणामध्ये फिर्यादीने केवळ तो डॉक्टर आणि निवृत्त पोलीस यांच्यावर तक्रार दाखल केली होती. त्या आधारे चंदगड कोर्टाने पोलिसांना कडक तपासाच्या सूचना दिल्या होत्या. हा प्रथमदर्शनी मोठा घोटाळा दिसत असून याचा सखोल तपास व्हावा असे आदेश कोर्टाने त्याचवेळी दिले आहेत. या आधारावर पोलिसांनी याचा तपास केला असता यामध्ये दोनजण नसून आणखी ५ जणांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले. त्या आधारावर १ तलाठी, रेकार्ड विभागातील २ कर्मचारी आणि २ एजंट सापडले. तो डॉक्टर सोडून बाकी ६ जणांना पोलिसांनी तत्काळ अटक केली. त्यातील १ निवृत्त पोलिसाला चंदगड न्यायालयाने ३ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर वयोवृद्ध असल्याने १ लाख रुपयाच्या जात मुचलक्यावर, कोर्टात हजेरी आणि पासपोर्ट जमा करण्याच्या अटीवर तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. बाकीचे संशयित सध्या तुरुंगात आहेत.

या प्रकरणातील काही जणांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती पण त्यांना यश आले नाही. एवढी तत्परता पोलिसांनी दाखवून सर्व आरोपींना अटक करून दाखविली मात्र त्या ‘डॉक्टरसाहेबां’ना व्हीआयपी वागणूक का मिळत आहे? याचा ‘अर्थ’ काय?  कोणती मोठी ताकद त्या डॉक्टरांच्या मागे उभी आहे की त्यांच्यापर्यंत पोलिसांचे हातही पोहोचू शकत नाहीत असा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर निर्माण झाला आहे. एरवी कोरोनाच्या कालावधीत सर्वसामान्याने किरकोळ नियम मोडला तरी गुन्हा दाखल करणारे पोलीस या प्रकरणात का गप्प आहेत?