चंदगड शासकीय जमीन हडप प्रकरण : फिर्यादीच्याच मागे अधिक ससेमिरा…

0
4396

कोल्हापूर (प्रतिनिधी) : चंदगड येथील शासकीय जमीन हडप प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या डॉक्टरांनी अशी काही जादू केली आहे की सर्वांचेच ‘मेंदू’  बधिर झाले आहेत की काय अशी शंका येऊ लागली आहे. एकाच वेळी सर्व पातळीवर कारवाईच्या नावानं ‘उजेड’ पडतो आहे. परिणामी, तपास यंत्रणेचा ससेमिरा आरोपीच्या मागे लागण्याऐवजी फिर्यादीच्याच मागे लागल्याचे दिसते. या प्रकरणात ‘चोर सोडून संन्याशाला’ फाशी देण्याचा प्रकार घडत असल्याने फिर्यादी चक्रावून गेला आहे. 

या प्रकरणात चंदगड पोलिसांनी आत्तापर्यंत ६ संशयितांना जेरबंद केले आहे. फिर्यादीने आपल्या फिर्यादीत सर्व घोटाळ्यासंबंधी स्पष्ट उल्लेख केला आहे. लेखी स्वरूपात तक्रार फिर्यादीने तत्कालीन महसूलमंत्री, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीसप्रमुख, जिल्हाधिकारी, चंदगडचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि चंदगडचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे दिली आहे. या तक्रारीतच फिर्यादीने आपल्या जीविताला धोका आहे. तसेच आपल्याला अन्य कोणत्या तरी प्रकरणात नाहक अडकविण्याचा प्रकारही होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.

डॉक्टरांना वाचवण्याचे किंबहुना या प्रकरणातून अलगद बाहेर काढण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एका वकीलबाबूंनी हे प्रकरण दाबण्यासाठी फिर्यादीलाच आमिष दाखवून वश करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. साम, दाम, दंड, भेद या नीतीचा अवलंब केला जात आहे. आपल्या वरपर्यंत अगदी मंत्रालयापर्यंत ओळखी आहेत. त्यामुळे फिर्यादीने या टप्प्यावरच थांबावे, अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील, अशी अप्रत्यक्ष धमकीही त्याला दिली आहे. त्याला फिर्यादीने आत्तापर्यंत भीक घातलेली नाही. या प्रकरणासंबंधी सर्व माहिती फिर्यादीत दिली आहे.

तरीही या प्रकरणात ‘डॉक्टरां`ना ‘व्हीआयपी’ ट्रीटमेंट कशी काय दिली जाते, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. फिर्याद दाखल झाल्यावर पोलिसांनी संशयित आरोपींवर भा. द. वी. संहिता १८६० नुसार ४१८, ४२०, ४६६, ४६७, ४६८ आणि ३४  या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे १४ जानेवारी २०२० ला हा गुन्हा दाखल झाला आहे. त्याला एक वर्ष उलटूनही संशयित आरोपीला अटक करणे तर सोडाच, पण  त्याला या प्रकरणातून चार हात लांब ठेवून अलगद बाहेर कसा काढता येईल, यासाठीच पुरेपूर प्रयत्न झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे.

इतका मोठा घोटाळा अंगाशी येऊनही डॉक्टर काही घडलेच नाही,  अशा आविर्भावात आपल्या प्रतिथयश हॉस्पिटलमध्ये येऊन दैनंदिन कामकाज करीत असल्याचे समजते. डॉक्टरना वाचविण्यासाठी शहरातील काही लोकप्रतिनिधी जिवाचा आटापिटा करत आहेत. त्यांनी फिर्यादी आणि वृत्त प्रसारित करणाऱ्या माध्यमांवरही टीका करायला चालू केली आहे. डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला आहे याचा विसर त्यांच्यावरील प्रेमामुळे पडला आहे. वास्तविक टीका करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी गंभीर प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकणे आवश्यक आहे. मात्र हे लोकप्रतिनिधी फिर्यादी आणि माध्यमांवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत.

एकंदर सर्व परिस्थिती पाहता अजूनही या प्रकरणात डॉक्टरांवर एवढी ‘मेहेरनजर’ का, असा प्रश्न जनतेला पडला तर नवल वाटायला नको. या प्रकरणातील अन्य संशयितांना एक आणि डॉक्टरांना एक असा न्याय असे का ?  हा दुजाभाव कशासाठी असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. एक वर्षानंतरही त्यांच्यावर कसलीच कारवाई नाही. त्यांचा नेमका गॉडफादर कोण,  हे कोडे अजूनही उलगडत नाही..!