राज्यात पुढील २४ तासांत अतिवृष्टीची शक्यता

0
303

पुणे (प्रतिनिधी) : ‘गुलाब’ चक्रीवादळ शांत झाले असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात पुढील २४ तासांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार आणि अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुढील ३-४ तासात धुळे, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पुढील २४ तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार व अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे विदर्भात प्रभाव कमी असणार असून बुधवारी कोकण व मध्य महाराष्ट्रात याचा प्रभाव राहिल.

दरम्यान, ‘गुलाब’ चक्रीवादळ सोमवारी निवळल्याने त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. हे क्षेत्र सध्या छत्तीसगड आणि ओडिसाच्या दक्षिणेला आहे. त्यानंतर ३० सप्टेंबरला कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात प्रवेश करून त्याची तीव्रता पुन्हा वाढणार आहे. त्यामुळे नवे ‘शाहीन’ नावाचे चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज आहे.