पुणे (प्रतिनिधी) : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघात संपर्क वाढवला आहे.  मतदारसंघात आपल्या पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यास सुरूवात केली आहे. जुन्या कार्यकर्त्यांची भेट घेणे, लोकांसोबत सायकलिंग करणे, पोहणे, शेतशिवारातून पेरफटका मारत लोकांचे प्रश्न समजून घेत आहेत. त्यामुळे जानकर पुन्हा बारामती लोकसभा लढवण्याची तयारी करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

जानकर म्हणाले की, महाराष्ट्रातून फिरुन येऊन मी बारामती लोकसभा मतदारसंघात मुक्कामासाठी येत आहे. बारामतीच्या सर्व जाती-धर्माच्या लोकांनी मला खूप भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळे मी बारामतीकरांना वाऱ्यावर सोडणार नाही. बारामतीत लक्ष घालून मी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहून पुढील रणनीती आखण्यासाठी माझे हे दौरे आहेत.  

दरम्यान, महादेव जानकर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. अटीतटीच्या लढतीत त्यांचा ६९,७१९  मताधिक्याने पराभव झाला होता. पहिल्यादांच खा. सुळे यांचे मताधिक्य कमी करण्यास जानकर यशस्वी ठरले होते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला होता. आता त्यांनी पुन्हा एकदा मतदारसंघात जनसंपर्क वाढवल्याने जानकर २०२४ ची लोकसभा लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकंदरीतच जानकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना शह देण्याचे संकेत दिले आहेत.