शेतकऱ्यांचे आजपासून चक्काजाम आंदोलन; महामार्ग रोखून धरण्याचा इशारा

0
79

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आजचा १७वा दिवस आहे. आतापर्यंत अनेक बैठकांच्या फेऱ्या झाल्या मात्र शेतकरी अद्यापही आपल्या मागणीवर ठाम असून आता त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दिल्लीला जोडणारे महामार्ग अडवून ‘चक्का जाम’ आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष बलबीर. एस. राजेवाल यांनी शेतकऱ्यांच्या वतीने हा इशारा केंद्र सरकारला दिला आहे. आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा दिल्ली-मध्य प्रदेश-राजस्थान-गुजरातच्या दिशेने जाणारे महामार्ग रोखून धरू, असा इशारा देण्यात आला आहे. या शेतकरी आंदोलनावरून देशात एकीकडे राजकारण सुरू आहे. राजकीय पातळीवर आरोप-प्रत्यारोप सुरू असताना शेतकऱ्यांनी हे आंदोलन आणखीन आक्रमक करण्याचा इशारा दिला आहे. १४ डिसेंबरला पुन्हा एकदा भारत बंद करण्याचे आवाहन देखील दिले आहे.

उपजिल्हाधिकारी कार्यालये, भाजप नेत्यांच्या घरासमोर निदर्शने या व्यतिरिक्त टोल नाक्यावर गाड्या अडवण्यात येतील मात्र रेल्वे, लोकल अथवा लांब पल्ल्याच्या गाड्या अडवण्याबाबत कोणताही हेतू नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. नवा कृषी कायदा रद्द करण्याची या शेतकऱ्यांची मागणी आहे. हा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत शेतकरी आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.