कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाच्या आनंदराव पाटील – चुयेकर प्रशिक्षण केंद्रामार्फत दूध संस्था सदस्‍य, सचिव व दूध उत्‍पादक शेतकरी, महिलांना प्रशिक्षण दिले जाते. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आर. बी. पी. स्‍वयंसेवकांना जनावरांवरील आयुर्वेदिक औषधोपचार प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन आज (गुरुवार) ताराबाई पार्क येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये संघाचे चेअरमन विश्‍वास नारायण पाटील यांचे हस्‍ते झाले.

आर.बी.पी. स्‍वयंसेवकांसाठी हा प्रशिक्षण वर्ग दोन दिवस चालणार आहे. यामध्‍ये जनावरांच्‍या आजारामधील आयुर्वेदिक उपचार पद्धतीचे महत्त्व, उपयोगिता, हर्बल गार्डन व्हिजिट व आयुर्वेदिक औषधोपचारामध्‍ये उपयोगी येणाऱ्या वनस्‍पती व पदार्थाची ओळख व त्‍यांचे गुणधर्म, प्राथमिक आयुर्वेदिक औषधोपचारामध्‍ये केंद्रामध्‍ये स्‍वयंसेवकांनी जबाबदारी व कार्यपद्धती, जनावरांचे आजार व त्‍यासाठी वापरण्‍यात येणारी उपचार पध्‍दती  आदी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे.

उद्घाटनप्रसंगी विश्‍वास पाटील म्हणाले की, गोकुळ दूध संघामार्फत  व्‍यवसाय वाढीसाठी विविध योजना राबवून दूध उत्पादन किफायतशीर होण्यासाठी प्रशिक्षणातून मार्गदर्शन केले जाते. प्रशिक्षणाचे विविध कार्यक्रम घेऊन दूध उत्पादकाना प्रशिक्षण द्यावे.

पशुसंवर्धन विभागाचे व्‍यवस्‍थापक डॉ. यू. व्‍ही. मोगले यांनी प्रास्ताविक, डॉ. विजय मगरे यांनी आभार मानले. या वेळी  सहा. व्‍यवस्‍थापक डॉ. पी. जे. सोळुके, डॉ. दळवी, डॉ. कामत, डॉ. मगरे, डॉ.गो-हे व संघाचे अधिकारी तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.