मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळा प्रकरणात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या चार मुलांची नावे आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चौघांचीही प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. याप्रकरणी बदनामीसाठी हा सगळा कट रचल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले.

परीक्षा परिषदेकडून जी यादी जाहीर करण्यात आली. त्यामधील सर्व अपात्र असणाऱ्या उमेदवारांनी पात्र होण्यासाठी सुपे यांना पैसे दिले होते; परंतु सुपे यांच्याकडून अपात्र उमेदवारांना पात्र असण्याचे प्रमाणपत्र मिळाले नव्हते. या उमेदवारांमध्ये आता अब्दुल सत्तार यांच्या मुली हिना आणि उजमा तसेच, त्यांचा मुलगा व आणखी एका मुलीचे नाव असल्याचे समोर आले आहे.

हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख या दोन्ही शिक्षिका अब्दुल सत्तार यांच्या मुली असून, २०२० मध्ये त्या अपात्र ठरल्या आहेत. त्यांची आणखी एक मुलगी आणि मुलगाही अपात्र ठरले आहेत. सायबर पोलीस आणि परीक्षा परिषद यांनी जी यादी प्रसिद्ध केली, त्यामध्ये या चारही मुलांचा समावेश आहे. या चोघांची नावे समोर आली असली, तरी त्यांनी नेमक्या कोणत्या एजंटला पैसे दिले याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांच्या अडचणीच वाढण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बदनामीसाठी हा सगळा कट रचण्यात आला आहे. आमची चूक असेल, तर आमच्या मुलांवर कारवाई करावी. नसेल तर हे सर्व करणाऱ्यांना फासावर लटकवा. या प्रकरणाची नीट चौकशी व्हावी. कुणाचीही बदनामी करण्याचे काम कुणी करु नये. चुकीची माहिती देऊन बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी.’ असे सत्तार यांनी म्हटले. दरम्यान, या यादीत संभाजीनगर जिल्ह्यातील काही उमेदवारांचा समावेश असल्याचे समजते. यादी जाहीर झाल्यानंतर गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची नावेही समोर आलेली आहेत.