भारतीय संघराज्य मोडीत काढण्याचा केंद्राचा डाव : डॉ. गणेश देवी

0
85

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : देशात ‘वन नेशन वन इलेक्शन’ घोषणा ऐकायला मिळत आहे. म्हणजेच संघराज्य मोडून हुकूमशाही आणण्याचा केंद्राचा डाव आहे. त्यामुळे नागरिकांना दक्ष राहावे लागणार आहे. डॉ. बाबासाहेबांनी लिहीलेले सविधान मोडून लोकशाही गाडून सर्व सत्ता आपल्याच हातात केंद्र सरकार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी जागरूक व सावध राहावे, असे आवाहन राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी केले.

गडहिंग्लज नगरपरिषद आयोजित व्याख्यान व विविध पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. गणेश देवी बोलत होते. त्यांचे ‘आजचे वर्तमान’ या विषयावर व्याख्यान झाले. त्याआधी साने गुरुजी वाचनालयाच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी बाबासाहेब नदाफ यांना (डॉ. नरेंद्र दाभोळकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार) पुष्पा पाटील यांना (आदर्श शिक्षिका पुरस्कार) तसेच व्यंकटेश किनी व मंजूर बागवान यांना आदर्श वाचक पुरस्कार देण्यात आला.

डॉ. गणेश देवी म्हणाले की, देशात सविधानात्मक संस्था मोडीत काढण्याचा डाव चालू आहे. सुप्रीम कोर्ट, रिझर्व्ह बँक, विद्यापीठे, सीबीआय केंद्राचे काम करत आहेत. देशात जातीयवादी विष पसरविण्याचे काम चालू आहे. हे बंद झाले पाहिजे.

यावेळी नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी, मुख्याधिकारी नागेश मुतकेकर आदीसह कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.