नवी दिल्ली ( वृत्तसंस्था) : कोरोना काळामध्ये मोठ्या संख्येने रुग्णांचा मृत्यू ओढवला. यामुळे देशात असंख्य मुले अनाथ झाल्याचं पाहायला मिळत आहे.ज्या मुलांचे दोन्ही पालक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत, अशा मुलांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.या मुलांच्या शिक्षणाची आणि त्यांच्या भवितव्याची सोय व्हावी, म्हणून आता थेट केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे.त्याशिवाय, या मुलांच्या शिक्षणाची देखील सोय या निधीमधून लावली जाणार आहे.केंद्र सरकारच्या या निर्णयाचा मोठा फायदा अशा मुलांना होणार आहे.

वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्टायपेंड!

कोरोनामुळे आपल्या आई-वडिलांना गमावलेल्या मुलांना पीएम केअर फॉर चिल्ड्रेन या योजनेअंतर्गत आर्थिक मदत केली जाणार आहे. या मुलांना वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा स्टायपेंड अर्थात निश्चित अशी रक्कम दिली जाईल. त्यासोबतच त्यांनी वयाची २३ वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांना १० लाख रुपयांची रक्कम दिली जाईल.त्यांच्या भवितव्यासाठी ही रक्कम त्यांना मोठा हातभार लावणारी ठरेल.

मोफत शिक्षण!

अशा मुलांच्या शालेय शिक्षणाचा पूर्ण खर्च हा केंद्र सरकारकडून केला जाणार आहे. त्यामुळे या मुलांना शिक्षण मोफत मिळणार आहे. त्यासोबतच, उच्च शिक्षणासाठी या मुलांना शिक्षण कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. या कर्जाचं व्याज हे पीएम केअर फंडातून चुकवलं जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शून्य टक्के व्याजदराने हे शिक्षण कर्ज उपलब्ध होईल.

मुलांसाठी मोफत आरोग्य विमा !

शिक्षण आणि आर्थिक मदतीसोबतच आयुषमान भारत योजनेअंतर्गत या मुलांचा ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा देखील काढला जाईल. १८ वर्षांपर्यंत या मुलांना या विम्याचं संरक्षण राहील. या विम्याचे हफ्ते केंद्र सरकारकडून भरले जातील.