केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना काम करुनही मिळत नाही दाम…

0
465

कोल्हापूर (सरदार करले) :-  काम करूनही त्याचे कबूल केलेले दाम वर्षोनुवर्षे मिळत नसेल तर तो दोष प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचा की काम देणाऱ्याचा हे सांगायला कुणा तज्ञाची गरज नाही. अशीच अवस्था करवीर (२७५) व शाहूवाडी (२७७) विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) झाली आहे.गेल्या तीन वर्षांपासून या अधिकाऱ्यांना मानधन मिळालेले नाही. दीपावलीच्या अगोदर हे थकीत मानधन मिळाले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या दोन मतदार संघातील सुमारे ३०० बीएलओ अधिकाऱ्यांना एक पैही मानधन मिळालेले नाही. थकीत मानधनाची रक्कम प्रत्येकी १८ हजार म्हणजेच लाखांच्या घरात रुपये थकीत आहेत.

प्रत्येक मतदार संघातील मतदार याद्या अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाकडून गाव पातळीवर बीएलओवर सोपवली जाते. मयत मतदारांची नावे वगळणे, नव्या मतदारांची नावे यादीत समाविष्ठ करणे तसेच निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी सांगितले  जाणारे काम बीएलओना करावे लागते. मतदार यादी पुनर्निरीक्षणाची जबबादारी त्यांच्यावर असते. मतदार संघ आणि निवडणूक आयोग यांच्यातील प्रमुख दुवा तो असतो. मुख्य कणाच लाभापासून वंचित ठेवला जात आहे.

अशा कामाची जबाबदारी शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कार्यालयातील कारकून, ग्रामसेवक यांच्यावर सोपवली जाते. मतदान केंद्रांच्या संख्येवर बीएलओ नियुक्त केले जातात. दरवर्षी सहा हजार रुपये इतके मानधन त्यांना दिले जाते. काम करूनही गेली तीन वर्षे हे मानधनच त्यांना मिळालेले नाही.

काम करूनही वेळेत मोबदला मिळत नाही. त्यामुळे या बीएलओनी संघर्षाचा पर्याय शोधला आहे. थकीत मानधन दिवाळीपूर्वी मिळावे  या मागणीचे निवेदन पन्हाळा तहसीलदार रमेष शेंडगे यांना सोमवारी दिले जाणार आहे. त्यानंतरही मानधन मिळाले नाही तर निवडणुकीच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. मानधन वेळेत मिळत नसल्याने अंगणवाडी सेविकांनी हे काम या अगोदरच बंद केले आहे.