केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठीच्या योजना घराघरात पोहचवणार : समरजितसिंह घाटगे

0
19

कागल (प्रतिनिधी) : शेती व्यवसाय आणि शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. केंद्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यासाठी उपयुक्त अनेक योजना आहेत. त्या शेतकऱ्यांच्यापर्यंत शाहू ग्रुपच्या माध्यमातून कशा पोहोचतील. त्या प्रभावीपणे कशा राबविता येतील, यासाठी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेतल्याचे शाहू साखर कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.

या चर्चेमध्ये, किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज आणि अनुदान योजना कशा राबण्यात येतील, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत विविध योजना पश्चिम महाराष्ट्रामध्ये राबवण्यास भरपूर वाव आहे. त्याबाबतही केंद्र पातळीवर शेतकऱ्यांना मदत व्हावी अशी विनंती घाटगे यांनी केली. याचबरोबर फार्मर प्रोड्युसर कंपनी व फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन करीता असणाऱ्या सुविधा शेतकऱ्यांना सहजपणे उपलब्ध द्याव्यात. तशा सुचना स्थानिक संस्था व संबंधित विभागांना सूचना देण्यात याव्यात अशी विनंतीही घाटगे यांनी केली.

दिल्ली येथील कृषी मंत्रालयातील दालनात केंद्राच्या विविध योजनांसह अनुदानाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी ना. तोमर यांनी सकारात्मकपणे निर्णय घेत असलेची ग्वाही घाटगे यांना दिली.

यावेळी कृषिमंत्र्यांचे अतिरिक्त खाजगी सचिव कुलदीप राठोरे, शाहू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, मुख्य शेती अधिकारी रमेश गंगाई उपस्थित होते.