नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली परिस्थिती आता नियंत्रणात आहे, पण आगामी काळात आपण कोरोनाच्या नियमांचे पालन केले नाही, तर परिस्थिती पुन्हा बिघडू शकते. त्यामुळे पुढील १०० ते १२५ दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्राने प्रशासनाला आणि नागरिकांना हा इशारा दिला आहे.

याबाबत निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांत कोरोनाची स्थिती चिंताजनक होत असल्यामुळेच संपूर्ण जगभरात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही तशा प्रकारची चिंता व्यक्त करुन सर्व देशांना उपाययोजना करण्यास सांगितले आहे. भारतात हर्ड इम्युनिटी लेव्हलपर्यंत ही लोकसंख्या अद्याप पोहोचलेली नसल्यामुळे धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळेच येणारे १०० ते १२५ दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. या काळात आपण कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तीन ते चार महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यास आपण कोरोनाच्या संभाव्य धोक्यापासून बचाव करु शकतो.