नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एकीकडे देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरू लागलेला असतानाच दुसरीकडे म्युकरमायकोसिस पाठोपाठ डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका निर्माण झाला आहे. सध्या देशात विषाणूच्या या प्रकाराचे फारसे रुग्ण जरी नसले, तरी त्याची क्षमता आणि त्याच्या प्रसाराचा वेग पाहता केंद्र सरकारने महाराष्ट्र, केरळ आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांना तातडीने पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने या तीनही राज्यांच्या मुख्य सचिवांना या संदर्भात पत्र पाठवले आहे.

डेल्टा प्लसचे एकूण २२ रुग्ण भारतात सापडले आहेत. त्यातही महाराष्ट्राच्या रत्नागिरी आणि जळगावमध्ये २२ पैकी १६ रुग्ण तर उर्वरित रुग्ण केरळमधील पलक्कड आणि पथ्थनमथित्ता, मध्य प्रदेशमधील भोपाळ आणि शिवपुरी जिल्ह्यांमध्ये आढळले आहेत. डेल्टा प्लसचे रुग्ण ज्या ठिकाणी आढळले आहेत, त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन, गर्दी कमी करणे आणि लोकांचा एकमेकांशी संपर्क कमी करणे, व्यापक प्रमाणावर चाचण्या करणे, ट्रेसिंग वाढवणे आणि जास्तीत जास्त लोकांना लसीकृत करणे अशा उपाययोजनांसंदर्भात राज्य सरकारांनी तातडीने पावले उचलावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.