नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं कांद्याच्या किमतीवर थेट परिणाम करणारा मोठा निर्णय घेतला आहे.  मागील तीन महिन्यांपासून कांदे निर्यातीवर लावलेले प्रतिबंध हटविण्यात आले आहेत. १ जानेवारी २०२१ पासून हा निर्णय देशभरात अमलात येणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

केंद्र सरकारनं सप्टेंबर २०२० मध्ये कांद्याच्या निर्यातीवर प्रतिबंध आणला होता. देशात कांदा उपलब्ध व्हावा आणि त्याच्या वाढणाऱ्या किमतींना आळा बसावा यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्या वेळी सरकारनं सांगितलं होतं. त्या वेळी दक्षिण भारतात अतिवृष्टी झाल्याने कांद्याचं पीक मोठ्या प्रमाणावर नष्ट झालं होतं.

भारतानं २०२० मध्ये एप्रिल ते जूनच्या दरम्यान १९.८ कोटी डॉलर्स किमतीचा कांदा निर्यात केला होता. याशिवाय २०१९ मध्ये हीच निर्यात ४४ कोटी डॉलर्स इतक्या किमतीची झाली होती. भारतातून सर्वाधिक कांदा श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिरातीत निर्यात केला जातो.