कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने दि. ९ व १० डिसेंबर रोजी जिल्हा ग्रंथोत्सव-२०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध साहित्यिक कार्यक्रमांची पर्वणी असणार आहे.

या ग्रंथोत्सव सोहळ्यासाठी जिल्ह्यातील साहित्यप्रेमी, ग्रंथप्रेमी, वाचक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा ग्रंथोत्सव जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी केले आहे.

ग्रंथोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी ११  वाजता राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थान उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे भूषविणार आहेत. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कादंबरीकार दि. बा. पाटील उपस्थित राहणार आहेत.

दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ही ग्रंथदिंडी राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा-दसरा चौक-बिंदू चौक- शिवाजी रोड- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावरुन राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे येईल. ग्रंथदिंडी सोहळ्याचा शुभारंभ साहित्यिक किरण गुरव यांच्या हस्ते ग्रंथ पूजनाने होणार आहे.

दुपारी ३ वाजता कविवर्य पाटलोबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘कवी संमेलन’ होणार आहे. या संमेलनामध्ये चंद्रकांत पोतदार, नीलेश शेळके, अनिल महाजन, सचिन इनामदार, दिनकर खाडे, मंदार पाटील, विष्णू पावले, विक्रम राजवर्धन, आनंद रंगराज, सुप्रिया आवारे, संजय थोरात, भिमराव पाटील, आनंदा शिंदे, राजेंद्र कोळेकर, सतीश तांदळे आदिंचा सहभाग राहणार असून सुनंदा शेळके सूत्रसंचालन करणार आहेत.

शनिवार, दि.१० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा विसुभाऊ बापट यांचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ३ वाजता शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘ऐकाल तर वाचाल’ या विषयावर व्याख्यान होईल. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते थिंक बँक लाईव्हचे संपादक विनायक पाचलग असणार आहेत.

दुपारी ४ वाजता ग्रंथोत्सव सोहळ्याचा समारोप सभारंभ ज्येष्ठ लेखिका सुमित्रा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ. पांडुरंग सारंग यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ग्रंथोत्सवात सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत ग्रंथ प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा ग्रंथोत्सव जिल्हा समन्वय समितीच्या सदस्य सचिव अपर्णा वाईकर यांनी दिली आहे.