कागल  (प्रतिनिधी) : श्री छ. शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसाठी २१ टक्के तर राजे विक्रमसिंह घाटगे बँकेच्या कर्मचाऱ्यांना २५ टक्के इतका उच्चांकी बोनस शाहू कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांनी जाहीर केला. याबद्दल शाहू कारखाना आणि राजे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामदैवत गहिनीनाथ गैबीपीर आणि श्रीराम मंदिर येथे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी राजर्षी छ. शाहू महाराज आणि स्व. विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करत फटाक्यांची आतषबाजीही केली. कर्मचाऱ्यांना चांगला बोनस देऊन कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केल्याबद्दल समरजितसिंह घाटगे यांचा सत्कार कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी शाहू साखर कामगार संघटनेचे सचिव बाळासाहेब तिवारी म्हणाले,  कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी शाहू  कारखान्यामध्ये सभासद शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले. उच्चांकी ऊस दराप्रमाणे त्यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त चांगला बोनस देण्याची परंपरा सुरु केली. आता हिच परंपरा विद्यमान चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे पुढे चालवीत असल्याचे सांगितले.

कारखान्याने कर्मचाऱ्यांसाठी मेडिक्लेम योजना, वाचनालय सुविधा, सवलतीच्या दरात कॅन्टीन आणि साखर सुविधा पुरविण्यात येत आहेत. कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी शाहू परिवार वार्ता हे हाऊस मॅगझीन सुद्धा सुरू करण्यात आले आहे. कारखान्याच्या सभासदांना प्रमाणेच कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आलेली आहे. साखर संघ आणि शासन पातळीवर आजपर्यंत जे वेतन करार कर्मचाऱ्यांसाठी झालेले आहे. ते सर्व सर्वप्रथम शाहू कारखान्याने लागू करून घेतलेले आहेत. तसेच त्याचा फरकसुद्धा ज्या त्या वेळी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला आहे.

यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष कृष्णात चव्हाण, माजी अध्यक्ष मारुती अंगज यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.