शाहू साखर कारखान्याचा ४४ वा वर्धापन दिन साजरा

0
103

कागल (प्रतिनिधी): येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचा ४४ वा वर्धापन दिन उत्साहात झाला. यानिमित्त कारखान्याच्या प्रांगणातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज, कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्यास व कागलाधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या प्रतिमेस चेअरमन समरजितसिंह घाटगे, कारखान्याच्या संचालिका व शाहू ग्रूपच्या मार्गदर्शिका सुहासिनीदेवी घाटगे यांच्या हस्ते पुष्पाहार अर्पण करून अभिवादन केले.

त्यानंतर माजी कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा झाला. यावेळी राज्यस्तरीय सोयाबीन व भात पीक स्पर्धेतील विजेते अनुक्रमे मधुकर तेलवेकर, मलगोंडा कतगर यांचा सत्कार करण्यात आला. चेअरमन घाटगे म्हणाले, कारखान्याचे संस्थापक स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांचे कुशल मार्गदर्शन आणि कल्पक नेतृत्वाखाली शाहू साखर कारखान्याची स्थापना झाली. सभासद शेतकरी, कर्मचारी, ऊस पुरवठादारांच्या हिताला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. कारखान्याच्या प्रगतीत सभासदांसह कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान राहिले.
याप्रसंगी ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, सुदाम बल्लाळ, चंद्रकांत बोंगाळे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह शाहू ग्रुप मधील विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बाजीराव पाटील यांनी स्वागत तर शाहू साखर कामगार युनियनचे सचिव बाळासो तिवारी यांनी आभार मानले.