कागल (प्रतिनिधी) : सीसीटीव्ही कॅमेरे पोलिस प्रशासनाच्या कामकाजात उपयोगी ठरतात. त्यामुळे गुन्हेगारीवर वचक बसतो, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ते कागल शहराच्या सीसीटीव्ही कॅमेरा उपक्रमाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. कागल शहरात आयसीआयसीआय बँकेच्या सहयोगातून ध्वनियंत्रणेसह सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

ना. मुश्रीफ म्हणाले की, गुन्हेगार कितीही मोठा असला तरीही त्याला शिक्षा झालीच पाहिजे. गुन्हेगाराला जर वेळीच चाप लागला नाही तर तो मोठा गुन्हेगार होईल. म्हणूनच, ज्या-त्या गुन्ह्यांची शिक्षा गुन्हेगारांना वेळेलाच झाली पाहिजे. त्यामुळे पोलिसांचा योग्य वचक असलाच पाहिजे, असे प्रतिपादन केले.

जिल्हा पोलीस प्रमुख शैलेंद्र बलकवडे म्हणाले की, कागल शहराच्या बाजूला कोल्हापूर हे मोठे शहर तर दुसऱ्या बाजूला कर्नाटकातल्या बेळगाव जिल्ह्याची सीमा. त्यामुळे कागल नगरपालिका आणि कागल पोलीस स्टेशनने तंत्रज्ञानात टाकलेले हे पाऊल कौतुकास्पद आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे सामाजिक सुरक्षेत योगदान वाढेल.

यावेळी नगराध्यक्षा माणिक माळी, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, नगरसेवक चंद्रकांत गवळी, उपनगराध्यक्ष बाबासो नाईक, जयंत पाटील-कासारीकर, नितीन दिंडे, सौरभ पाटील, इरफान मुजावर, अस्लम शेख, आयसीआयसीआय बँकेचे स्वामी, मुख्याधिकारी टीना गवळी, ॲड. संग्राम गुरव आदी उपस्थित होते.